चैतन्य बघेल यांच्या सुमारे ६१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने ताबा घेतला

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचं महत्त्वपूर्ण कार्य होत आहे.
पुणे, दिनांक 15 नोव्हेंबर : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचं महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासह त्यांच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केलं.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीनं आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आदिवासी रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
भगवान बिरसा मुंडा यांना अवघं २५ वर्षांचं आयुष्य लाभलं; मात्र इतक्या कमी वयात त्यांनी मोठं कार्य उभं करून दाखवलं. ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेविरोधात त्यांनी ऐतिहासिक उलगुलान घडवला. हा लढा केवळ इंग्रजांविरोधात नव्हता, तर हक्क, जमीन, अस्तित्व आणि स्वाभिमानासाठीचा संघर्ष होता. त्यांचा संघर्ष आणि त्यागाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. खानदेश आणि सातपुड्यातील भिल्ल बांधवांचा इंग्रजांविरोधातील लढा, राघोजी भांगरे आणि रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी समाजानं केलेला उठाव, तसंच वीर बाबुराव शेडमाके यांनी गोंड वीरांची फौज उभारून ब्रिटिशांना दिलेली झुंज हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांना त्यांनी अभिवादन केलं.
जनजातीय गौरव दिनानिमित्त राज्यात आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाची लोकनृत्यं, लोकसंगीत, हस्तकला, वेशभूषा आणि जीवनशैली देशासमोर येणार आहे. पूर्वजांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यास या उपक्रमांची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेती, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना निसर्गाशी जोडलेल्या जीवनपद्धतीचं महत्त्व जवळून अनुभवता आलं. जल, जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी समाजाकडून पर्यावरणप्रेमाची प्रेरणा मिळते, असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत विकास पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा सर्वसमावेशक विचार ही महाराष्ट्राची ओळख आहे. विकासाचा लाभ प्रत्येक गाव, वाडी आणि पाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची शिकवण होती. स्वर्गीय अजित पवार यांनीही आयुष्यभर याच विचारानं काम केलं. हाच वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि पारधी मेळाव्यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे उपक्रम आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणारे असल्याचं त्यांनी सांगितलं.
आदिवासी रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सव आरोग्य आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक रानभाज्या आणि खाद्यपदार्थांना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे. अशा महोत्सवांमुळे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन होण्याबरोबरच या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्याची पालकमंत्री या नात्यानं आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील. पारधी समाजासह सर्व आदिवासी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करून त्यांनी सहभागी कलावंत आणि आदिवासी बांधवांचं कौतुक केलं. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
स्रोत: प्रसार भारती (पीबी-शब्द)







