मजकुराकडे जा
Tamir

मुंबई विद्यापीठातील नॅनोसायन्सेस केंद्राच्या अद्ययावतीकरणासाठी ९.७५ कोटींचा निधी मंजूर

1 मिनिटांत वाचा

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील 'राष्ट्रीय नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्रातील' अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या दुरुस्ती, देखभाल आणि अद्ययावतीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने ९.७५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे केंद्रातील महागड्या संशोधन उपकरणांचे पुनरुज्जीवन होणार असून नॅनोसायन्सेस, मटेरियल सायन्स आणि सेमीकंडक्टर यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठाने २००७ मध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून या राष्ट्रीय सामायिक संशोधन केंद्राची स्थापना केली होती. येथे सुमारे ७० कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे आणि २०१३ मध्ये कार्यान्वित केलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची क्लीनरूम सुविधा उपलब्ध आहे. केंद्रातील एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोमीटर, स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोप, एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर आणि मायक्रो रमन स्पेक्ट्रोमीटर यांसारख्या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी महागडे सुटे भाग आणि अद्ययावत सॉफ्टवेअरची तातडीची गरज होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत हा निधी मंजूर केला आहे.

या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना एकाच व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळते. शासनाच्या या अनुदानामुळे प्रगत सामग्रीचे विश्लेषण, विविध प्रयोग आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठी बळकटी मिळणार आहे.

आणखी बातम्या